By

Published on

ओम राऊत आणि तान्हाजी..

अलिकडे ऐतिहासीक विषयांवर बऱ्यापैकी चित्रपट येत आहेत. त्यात बरेचसे मराठी आणि हिंदी चित्रपट इतिहासाची मोडतोड करून बनविण्यात आलेले आहेत. आता दिग्पाल लांजेकर यांचा तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारीत सुभेदार हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यांचे सर्व चित्रपट पुर्णपणे इतिहासावर आधारीत असतात. त्यामुळे सुभेदार हा चित्रपट कितपत इतिहासाला धरून असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तदपुर्वी काही वर्षांपुर्वी तान्हाजी हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील काही त्रुटी आपण आधी बघुयात.

PC GOOGLE

तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित ओम राऊत यांचा ‌‘तान्हाजी’ हा चित्रपट जानेवारी 2020 रोजी हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. एखाद्या ऐतिहासिक विषयावर खास करून मराठ्यांची गाथा सांगणारा जर कोणी चित्रपट बनवत असेल आणि तोही बॉलिवूडमध्ये बनत असेल, तर ती एक अभिमाची गोष्ट असते. तान्हाजींच्या भूमिकेत अजय देवगण दिसणार असल्यामुळे तर चित्रपट पाहण्याची अजूनच उत्कंठा वाढली होती. यात महाराजांची भूमिका शरद केळकर यांनी प्रामाणिकपणे पार पाडली.

PC GOOGLE

चित्रपटाची सुरुवात एकदम उत्तम अशी करण्यात आली. तान्हाजींची एंट्री, संवाद यांमुळे काही ठिकाणी ऊर भरून येतो. तान्हाजी रायबाच्या लग्नाचं आमंत्रण महाराजांना देण्यासाठी येइपर्यंत चित्रपट मनात खूप भरतो. पण, त्याआधी मिर्झा राजा जयसिंह जेव्हा कोंढाण्यावर हल्ला चढवतो आणि त्यावेळी जिजाऊ या कोंढाण्यावर असतात, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी महाराज तहाला तयार होतात असं दाखवण्यात आलं आहे. पण, खरं तर, इतिहास याची वेगळीच नोंद आहे. आऊसाहेब महाराजांना कोंढाणा पुन्हा ताब्यात घ्यायला सांगतात. तेव्हा तान्हाजींच्या मुलाचं लग्न असल्यामुळे महाराज स्वतःच या मोहिमेवर जाण्याचं ठरवतात. या चित्रपटात महाराजांचा पिसाळ नावाचा सरदार मनात खोट ठेवून तान्हाजींना या मोहिमेबद्दल सांगतो. तान्हाजींना जेव्हा हे कळतं, तेव्हा ते स्वतः या मोहिमेवर जाणार असल्याचा हट्ट धरतात आणि नाईलाजाने महाराजांना त्यांना पाठवावं लागतं, अस दाखवण्यात आले आहे. ‌‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे’ हा प्रसंग आपल्या अंगावर काटा आणणारा आहे. पण, इथे थोड्या वेगळ्या पद्घतीने दाखण्यात आला.

PC GOOGLE

पुढे उदयभान सिंह राठोडची भूमिका बजावणारा सैफ अली खान याची कोंढाण्यावर किल्लेदार म्हणून नेमणूक होते आणि त्याला रस्त्यातच अडवून परास्त करण्याचा डाव महाराज आणि तान्हाजी करतात. महारांचा पिसाळ नावाचा सरदार ही माहिती उदयभानला सांगतो. तान्हाजी योजनेप्रमाणे शिरढोणमध्ये लपून बसून उदयभानची वाट पाहात बसतात. समोरून काही मोजके सैनिक येताना दिसतात. तान्हाजी आणि मावळे त्यांच्यावर हल्ला चढवतात. ते सर्व सैन्य मारलं जातं आणि थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात येतं की, उदयभान आलाच नाही. हे जे सैन्य मारले, ते मुघल सैन्य नसून, उदयभानने बंदिस्त करून पाठवलेले आपलेच मराठा होते. म्हणजे, इथे तान्हाजींची योजना फसली असा याचा अर्थ. मग प्रश्न असा पडतो की, त्यावेळी महाराजांचे हेर कुठे होते? ते तर महाराजांच्या नेहमी दहा पावले पुढेच असायचे. ही योजना जरी तान्हाजींची असली, तरी त्यामागचे खरे सूत्रधार हे शिवाजी महाराजच होते. महाराजांची मुंग्यांच्या प्रत्येक चालीवर बारीक नजर असायची, मग इथे आपलेच सरदार फितूर झालेले त्यांच्या लक्षात नाही का येणार? एकंदर, इथे तान्हाजींचा आणि महाराजांचा पराभव झाल्याचं दिसण्यात आलं.

PC GOOGLE

पुढे तान्हाजी एकटेच कोंढाण्याच्या एका जुन्या सैनिकाला भेटतात. किल्ल्याची संपूर्ण माहिती घेतात. तेव्हा त्यांना समजते की, किल्ल्यावर जिथे बंदीगृह आहे, तिथे एक मोठं वडाचं झाड आहे. आणि त्या मागे एक गुप्त रस्ता आहे. पण, तो कुठे बाहेर पडतो, हे शोधावं लागणार होतं. त्यासाठी तेथील घेरे सरनाईक म्हणून आहेत, त्यांनी यासाठी तान्हाजींची मदत केली. पण, पाहायला गेलं तर, असा कोणता गुप्त मार्ग असता तर महाराजांना माहिती नसेल असं होणं शक्यच नाही. महाराजांनी स्वतः योजना आखून त्या गुप्त वाटेने आपले सैन्य पाठवले असते. पुढे तान्हाजी एकटेच किल्ल्यात प्रवेश करून एका उत्सवात सामील होतात, आणि स्वतःलाच कैद करून घेतात. इथे असा प्रश्न पडतो की, याआधी किल्ला महाराजांच्या ताब्यातच होता. त्यावेळी तान्हाजी नक्कीच किल्ल्यावर जाऊन आले असणार. मग तेव्हा का नाही त्यांना या गुप्त मार्गाबद्दल कळाले?

PC GOOGLE

यावेळी उदयभानने ज्या राजकन्येला जबरदस्तीने कोंढाणा किल्ल्यावर आणलेलं असतं, तिचा भाऊ तान्हाजींना सोडवतो. त्यानंतर तान्हाजी त्या वडाच्या झाडाच्या मागे जातात. तो गुप्त रस्ता सरळ खाली जाणार असतो. तान्हाजी त्या गुप्त रस्त्यामधून खाली एका कड्यावर पडतात. नंतर तान्हाजी आपल्या गावी जातात. आपलं सैन्य सोबत घेऊन पुन्हा कोंढाण्याकडे निघतात. खरं तर, एवढं सगळं करण्यासाठी तेवढा त्यांच्याकडे वेळ होता का? तान्हाजींच्या मुलाचं लग्न असल्यामुळे त्यांनाही ती मोहीम वेळेत पूर्ण करायची इच्छा असणारच. पुढे ते आपल्या सैन्याला घेऊन कोंढाण्याच्या पायथ्यापाशी पोहोचतात. तिथे प्रत्येकाला आपली कामगिरी पुन्हा एकदा सांगतात. कडा चढून त्या गुप्त मार्गापर्यंत पोहोचतात. तान्हाजी त्या गुप्त मार्गाने काही सैन्याला पाठवून स्वतः मात्र दुसऱ्या मार्गाने किल्ला चढून जातात.

PC GOOGLE

त्यावेळी किल्ल्यावर उदयभानच्या विवाहाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. तान्हाजी हल्ला चढवतात, कल्याण दरवाजा, महाद्वार उघडले जातात. उदयभानला हे सर्व समजताच तोही मावळ्यांवर धावून जातो. तेवढ्यात उदयभान किल्ल्यावर असणाऱ्या नागीण नावाची तोफ राजगडाच्या दिशेने डागायला सांगतो. मुळात, प्रश्न असा की, ती एवढी भली मोठी तोफ कोंढाणा किल्ल्यावर कशी चढवली असेल? त्यावेळी एवढी भली मोठी तोफ किल्ल्यावर चढवणं अशक्यच. त्यात अतिशयोक्ती म्हणजे, त्या तोफेचा मारा राजगडापर्यंत पोहोचणार होता. उदयभान लढता लढता त्या तोफेपर्यंत पोहोचतो आणि त्या तोफेला सरबत्ती देतो. ती विझविण्यासाठी तान्हाजी घोड्यावर बसून त्या तोफेकडे धाव घेत आपल्या तलवारीने ती पेटती सरबत्ती कापतात. तेवढ्यात उदभान तान्हाजींचा हात कापतो. पुढे तान्हाजी आपल्या तुटलेल्या हाताला शेला बांधतात आणि दुसऱ्या हातात ढाल आणि तलवार धरतात. उदयभान तान्हाजींची ढाल तोडतो. हे जे दाखण्यात आलं ते संपूर्ण काल्पनिकच. आणखी एक अतिशयोक्ती म्हणजे, तान्हाजींची एवढी भक्कम ढाल तोडणाऱ्याला उदयभानला तान्हाजी एका हातोने धरून त्या भल्या मोठया तोफेला बांधतात आणि ती तोफ कड्यावरून खाली ढकलून उदयभानला मारतात.

PC GOOGLE

इथे तान्हाजींचा पराक्रम दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला; पण त्‍या ओघात 80 वर्षांचे शेलार मामा, भाऊ सुर्याजी आणि मराठ्यांचा पराक्रम वगळण्यात आला हे दुदैवं. या चित्रपटात काम करणारे कलाकार आणि खुद्द डायरेक्टर मराठी असून, इतिहासाची पुर्णपणे छेडछाड करण्यात आली आहे. आताच्या पिढीला किंवा नव्यानेच महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांस हा चित्रपट नक्कीच संभ्रमात टाकणारा आहे. आता दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार चित्रपट इतिहासाला कितीसा साजेसा आहे हे पहावं लागेलं…

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment