मी पहिलेले गणपती आणि अनुभवलेली भव्यता (परतीचा प्रवास)

गेटवे वरून पुन्हा मागे मालाड जायची वेळ आली होती पण तरीही काही करून अलिबाग जायचं होतच. थोडा वेळ विचार केला आणि दुसरा पर्याय सापडला. इथून सी.एस.टी. जाऊन रेल्वेने पनवेल आणि मग तिथून एस.टी. ने अलिबाग.

तसाच धावत गेटवे च्या बाहेर आलो आणि सी.एस.टी. कडे जणाऱ्या बस स्टॉपला थांबलो. बस येईपर्यंतच दहा मिनिटे तरी गेली असतीलच. बस लागली आणि चढलो. बस पूर्ण भरलेली. गेटवे वरून सी.एस.टी स्टेशन बस ने दहा मिनिटे तरी असेल. आता पुन्हा उभं राहून सी.एस.टी. स्टेशन पर्यंत जावं लागणार होतं. आता पाऊस थोडा कमी झालेला. पण तरीही त्या रस्त्याला खूप ट्रॅफिक. पाच मिनिटे झाली तरी बस पुढे जाईनाच. आता वीस मिनिटे झाली तरी बस पोचली नाही. काही जण कंटाळून बस मधून उतरून स्टेशनकडे चालत गेली. इथे सुद्धा खूप वर्षांनी आलेलो त्यामुळे रस्ता पूर्णपणे अनोळखी वाटत होता. त्या बस मधून अजून काही जण उतरली तर त्यांच्या मागे मागे गेलो. पुढे खूपच ट्रॅफिक होती. शोध घेत घेत सी.एस.टी स्टेशन पोचलो.

पटकन पनवेल तिकीट काढलं. पाच दहा मिनिटात रेल्वे लागली आणि रेल्वेत बसलो. कदाचित पाऊस पडत असल्यामुळे रेल्वे थोड्या उशिरा लागत होत्या म्हणून ती रेल्वे भेटली नाहीतर अजून वेळ गेला असता. आता आठ वाजायला आले होते. एक तास आता पनवेल पोचायला लागणार. आता पुन्हा पावसाने जोर धरला. बाहेर वीज चमकताना दिसत होती. पावसाला आधीच खूप कंटाळलेलो, अजूनही थांबायचं नावं घेत नव्हता. भीती एवढीच होती कि अजून खूप प्रवास बाकी आहे.

नऊ वाजले. एक तासाने पनवेल स्टेशन उतरलो. पाऊस थोडा कमी झालेला. आता पुन्हा पाच दहा मिनिटं एस.टी. डेपो पर्यंत चालायचं होतं. एक तास रेल्वेमध्ये बसलो म्हणून पायांना थोडा आराम भेटला. आताही बिना चपलेचच चालायचंय. कसा बसा एस.टी. डेपो पोचलो. सव्वा नऊ वगैरे वाजले असतील. तिथे अलिबाग एस.टी ची चौकशी केली असता ते म्हणाले शेवटची एस.टी. गेली. आता एकही एस.टी. नाही. बाहेरून पण कुठली येणारी एस.टी. नाहीय.

पनवेल ते अलिबाग अजून दोन तसाच अंतर होतं. एवढ्या रात्री जाणार कुठे? थोडा जास्तच बैचेन झालेलो. ह्या आधी पण खुप वेळा उशिरा गेलेलो पण तेव्हा बाहेरून आलेली एस.टी. भेटायची. आतातर सरळ सरळ सांगितलं की एस.टी. च नाही म्हणून. तसाच बाहेर मुख्य रस्त्यावर गेलो आणि कोण ओळखीचं किंवा तिकडे जाणार भेटतंय का बघत राहिलो. दहा मिनिटे झाली अजून काहीच नाही. आता वाटू लागलं की इथेच बहुतेक वस्ती. एवढी धावपळ करून आलो आणि उपयोग काहीच नाही. म त्या पेक्षा मालाड गेलो असतो परवडल असतं.

अजून काही वेळ गेला आणि मुंबईच्या बाजूने एक एस.टी. येताना दिसली. बघायला लागलो चुकून आपल्याकडची असेल तर आणि त्या एस.टी. वर फक्त मुरुड नाव वाचलं आणि पायात ताकद नसतानाही एस.टी. च्या मागे धावत गेलो. त्या एस.टी. मध्ये बसलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. एस.टी. साठी ज्या ज्या बाप्पाचा धावा केला त्या बाप्पांचे आभार मानले.

ते दोन तास कसेबसे गेले आणि बारा वाजता एकदाचं अलिबाग पोचलो. अलिबाग एस.टी. डेपो पासून दोन मिनिटांवर मित्राचं घरं होतं, ज्या कडे गाडी ठेवलेली. त्याच्या इमारतीच्या खाली कुत्र्यांचा कळप, सगळे कुत्रे अंगावर भुंकत राहिले. थोडं घाबरलेलो, जर ते कुत्रे अंगावर आले असते तर धावायची अजिबातच ताकद नव्हती. थोड्या वेळात मित्र खाली आला आणि जीवात जीव आला. थोडा वेळ त्या मित्रासोबत बोलत राहिलो आणि निघालो.

अजून माझं घर आठ किलोमीटरवर होतं. रस्त्याला काळोख, खड्डे, बारीक पाऊस. बाप्पाचं नावं घेत साडेबारा पर्यंत घरी पोचलो. आमचा बाप्पा जिथे बसतो तिथे जाऊन बाप्पाचे खूप आभार मानले, कारण माझा प्रवास सुखाचा झाला होता. त्रास तर खूप झाला होता पण सगळं सहज सहन करून इच्छा पूर्ण केली.

एवढा थकूनही त्या रात्री पहाटे चार वाजेपर्यंत जागरण केलं. कारण त्या साठीच तर धावपळ करत आलो होतो. उद्या बाप्पा जाणार तर त्या सोबत शेवटची रात्र तरी काढावी..

क्रमशः

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment