
शेवटचं काळाचौकी महागणपतीच दर्शन घेतलं आणि आता लोअर परळ स्टेशन वरून गेटवे जायचं होतं. खूप दिवसांनी आलेलो त्यामुळे स्टेशनकडे जाण्याचा रस्ता लक्षात येत नव्हता. मोबाईल बाहेर काढायचा तर पाऊस पडत होता. अंदाजानेच स्टेशनकडचा रस्ता पकडला. थोडं पुढे गेलो आणि मुख्य रस्त्याला चिंतामणीच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या उड्डाणपूलाखाली, आडोश्याला उभं राहून मोबाईल काढला आणि मॅपमध्ये स्टेशनकडे जाण्याचा रस्ता बघू लागलो. आता तिथून स्टेशन पर्यंत चालत जायला मला पंचवीस मिनिटे तरी लागणार होती. एकतर जोराचा पाऊस, कालपासून धावपळ, दिवसभर उपाशी पोटी, चपलेचा त्रास आणि त्यात आता अनवाणी चालायचंय. आता पुढे एक पाऊल चालायची पण इच्छा होत नव्हती. तरीही चालावं लागणार होतं.
आता पंधरा मिनिटे चालल्यानंतर भूक लागली म्हणून पुन्हा एक वडापाव खाल्ला आणि स्टेशनचा रस्ता पकडला. मी परळचा लक्ष्मी कॉटेजचा गणपती बघितल्यानंतर (बारा वाजल्यापासून) अजिबात बसलो नव्हतो. आता साडेपाच वाजून गेलेले म्हणजे जवळ जवळ साडेपाच तास तरी उभाच होतो. पाय अक्षरशः गळ्यात आलेले. पण काही करून अलिबाग जायचं होतं. तिथूनही माघार घेऊन पुन्हा मालाडला जाणं सोप होतं. पण घरचा गणपती उद्या जाणार आणि आज शेवटचं जागरण. जागरणाला संपूर्ण परिवार एकत्र असतो म्हणून काही करून अलिबाग जायचं होतं.
आता सहा वाजून गेले असतील. लोअर परळच्या स्टेशनवर पोचलो. तिथल्या पायऱ्या सुद्धा जिवाच्या वर चढल्या. चर्चगेट तिकीट काढलं आणि तिकडे जाणाऱ्या रेल्वेत बसलो. लोअर परेल वरून सहाव स्टेशन चर्चगेट. तिथे पोचायला तरी दहा मिनिटं लागणार होती. आणि मग बस वेळेत भेटली आणि ट्रॅफिक् नसेल तर पाच मिनिटांत गेटवे.
पुढच्या दहा मिनिटांत चर्चगेट पोचलो. स्टेशनच्या बाहेर आलो आणि समोर गेटवे कडे जाणारी बस लागलेली होती. पटकन चढलो. मी मुद्दामून किती वाजले बघत नव्हतो. ती बस गोल फिरून पलीकडे स्टॉपला थांबली. तिथे पाच मिनिटं जास्तच थांबलेली. मी मनातून खूप बैचेन होतो. वेळेत पोचेन की नाही आणि बोट भेटेल की नाही वगैरे.
थोड्यावेळात बस सुटली आणि गेटवे पोचेपर्यंत पाच मिनिटांपेक्षा जास्तच वेळ गेला. मी जसा बस मधून उतरलो तेच गेटवे कडे धाव घेतली. काल गेटवे च्या बाहेर जो बाप्पा होता त्या बाप्पाच्या समोर आज पडदा लावलेला होता. कदाचित संध्याकाळ झाली असेल आणि तिथले सेवेकरी कंटाळून लवकर आराम करायला गेले असावेत. आज त्या बाप्पाचं दर्शन झालं नाही. कदाचित काल मला आधार देण्यासाठीच तो उशिरा पर्यंत थांबला असावा.
आता मी जिथे मांडवाकडे जाणारी बोट लागते तिथे पोचलो. तिथे काही जण अलिबाग जाणारे उभे होते. मी तिथे पोचल्यावर कळालं की आता सात वाजलेत आणि शेवटची बोट साडे सहाची होती. इतरवेळी सात वाजताची एक असायची आणि शेवटची आठ वाजताची. पण आता पाऊस असल्यामुळे साडे सहाची शेवट होती. काही क्षण समजत नव्हतं काय करू कुठे जाऊ. शेवटी एकच पर्याय उरला होता की, गेटवे वरूनच मागे फिरून मालाड जावं.
तसा एक पर्याय होता, तो म्हणजे एस.टी.ने अलिबाग जायचा. पण एस.टी.ने जायचं तर आल्या रस्त्याला मागे जात मुंबई सेंट्रलला जावं लागलं असतं. तिथे जायला पुन्हा अर्धा तास आणि पुन्हा दहा-पंधरा मिनिटं चालणं. परत तेवढं जाऊन एस.टी. भेटली तर बरी. जर एस.टी. भेटली नाही तर एवढी धावपळ केलेली फुकट. मग तर तिथून पुन्हा मालाडला जाणंही अजून जीवावर येईल. मग पहाटेपर्यंत तिथेच वस्ती. मग तर एवढी धावपळ करून फायदा काय?
आता जिथून गणपती बघायला सुरवात केली होती तिथेच येऊन अडकलो. पून्हा गेटवे…
क्रमश:
Leave a comment