
अडीच तास रांगेत उभं राहून शेवटी एकदाचं लालबागच्या राजाचं दर्शन झालं. काल संध्याकाळ सारखा पावसाने अचानक काळोख करून जोर धरला. आता संध्याकाळचे सव्वापाच वाजायला आलेले. अजून खूप गणपती बघायचे राहिलेत. आणि अलिबागकडे जायला निघायचं सुद्धा होतं.
लालबागच्या राजाच्या मंडपातून बाहेर पडलो आणि पुढच्या गणपतीचा रस्ता धरला. कालची आणि त्यात सकाळी दहा वाजल्यापासूनची धावपळ, त्यामुळे पाय अक्षरशः गळ्यात आलेले. त्यात पुन्हा चपलेची भर. पावसामुळे पायाला लावलेले बँडेज निघालं आणि काल पेक्षा जास्तच पायाला लागू लागली. तरीही तशीच चप्पल घालून चालतच राहिलो.
आता पाच मिनिटं पूढे चालत आलो आणि समोर एक प्रवेशद्वार दिसलं. वर्षभर ह्या बाप्पाची ओढ लागलेली असते. आता तर दोन वर्षांनी योग आलेला बाप्पाला भेटण्याचा. त्या प्रेवेशद्वारावरच नावं वाचलं आणि मनातल्या सगळ्या चिंता निघून गेला.

ते नावं होतं ‘चिंचपोकळीचा चिंतामणी‘. ह्या बाप्पाचा मुंबईमधला सर्वात मोठा आगमन सोहळा असतो. म्हणून त्याला ‘आगमनाधीश’ म्हणतात. मुंबईमधल्या सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळापैकी हे एक मंडळ. आज मंडळाचं शतकोत्तर तिसरं वर्ष म्हणजे 103 वे वर्ष.
ह्या आधी चिंतामणी बाप्पाच्या दर्शनासाठी दोन वेळा येऊन गेलेलो. एकदा 2018 ला मित्रासोबत आणि नंतर 2019 ला बाप्पाच्या शंभराव्या वर्षी. 2019 ला बाप्पाच्या आगमनाला सुद्धा आलेलो पण तेव्हा मी पोहोचेपर्यंत बाप्पाचं आगमन झालं होतं. त्यात गर्दी तर खूप जास्तच. हालता येत नव्हतं एवढी गर्दी. त्यावेळी आगमनाला आलेलो खरा पण बाप्पाचं दर्शन काही झालंच नव्हतं. नंतर गणेशोत्सवामध्ये एकटाच आलेलो आणि मन भरून बाप्पाचं दर्शन घेतलं.
चिंतामणी बाप्पाच्या आगमनाची संपूर्ण मुंबई वाट पाहत असते. आधी मी पण म्हणायचो की का एवढं वेड लोकांना चिंतामणी बाप्पाचं? तिथेच बाजू बाजूलाच कितीतरी गणपती असतात. लालबाग, मुंबईचा राजा आणि खूप. तरीही चिंतामणी बाप्पाचं का एवढं वेड. ह्याचं उत्तर मला बाप्पाच्या पहिल्याच भेटीत भेटलेल. इकडे मोठ्या मंडळाच्या बाप्पाचा अवतार दरवर्षी वेगवेगळा असला तरी बाप्पाच्या मुखाची आखणी दरवर्षी एकच असते. त्यामुळे तेव्हा बाप्पाचं मुख दर्शन घेतलं आणि मी सुद्धा बाप्पाचा वेडा भक्त झालो. आता माझ्यासाठी जणू तो पंढरपूरचा विठ्ठलच.
गेली दोन वर्षे मंडळानी कोरोनामुळे गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला होता. त्यांनी त्यांच्या पूजेतली चांदीची मूर्ती पुजली होती. त्यामुळे दोन वर्षे चिंतामणी बाप्पाची भेट झाली नव्हती. आज दोन वर्षांनी त्याच्या दारात आलो. प्रवेशद्वारापासून 5 मिनिटांवर बाप्पाचा मंडप होता. पाऊस तर पडतच होता, पायातली चप्पल तर रडवत होती, पण काढून ठेवणार तरी कुठे. टाकुपण शकत नव्हतो. तसाच चालत चालत बाप्पाच्या समोर असलेल्या रांगेत उभा राहिलो. इथेपण थोडी गर्दी होतीच. मनांत असं झालेलं कधी एकदाच दर्शन घेतोय माझ्या चिंतामणीचं.
अक्षरशः रडकुंडीला आलेलो कारण एवढा त्रास सहन करत करत इथपर्यंत आलो होतो. आता बाप्पा समोर दिसू लागला. दहा मिनिटांत मी बाप्पाच्या पायापाशी पोचलो असेन. शेवटी त्यालाच भक्ताची काळजी. तिथे सुद्धा सगळ्यांना पटापट बाहेर जायला सांगत होते, पण मी तिथेच पुढे मागे होत रेंगाळत राहिलो. मला बाप्पाला खूप मनभरून बघायचं होतं. त्याच्याशी खूप काही बोलायचं होतं.

काल भर पावसात अलिबाग पासून चालू केलेली वारी आज माझ्या चिंतामणी बाप्पारूपी विठ्ठलाच्या चरणी येऊन पूर्ण झाली. काही क्षण त्याकडे बघत राहिलो आणि तो ही माझ्याकडे एक टक बघत राहिला. मी त्याचे गुणगान गात होतो. लालबागचा राजा जेवढा नवसाला पावतो तेवढाच चिंतामणी माझ्या मनातली चिंता घालवतो.
आता बाप्पाचा निरोप घ्यायची वेळ आली. आता निघावं लागणार होतं. आज त्याला सोडून मला माझ्या घरी जावं लागत होतं आणि उद्या तो ही मला सोडून त्याच्या घरी जाणार होता. बाप्पाला, माझ्या विठ्ठलाला एकदा मनभरून बघितलं आणि तिथून निघालो.
बाहेर पावसाचे खेळ चालूच होते. कालपासून बाप्पाच्या दारात चपलेने खूप जास्तच त्रास दिलेला. काही क्षण तसाच उभा राहिलो. चप्पल फेकून द्यावीशी वाटू लागली. एकतर आधीच दमलेलो आणि त्यात चपलेमुळे चालवतही नव्हतं. शेवटी चप्पल काढली, पिशवीत भरली आणि नंतर बॅगेत भरली. आता अनवाणीच अलिबाग पर्यंत जावं लागणार होतं. तेव्हा मनात आलं की, पुढच्यावर्षी साठी लालबागच्या राजापुढे केलेला नवस त्याने आजच पूर्ण करून घेतला.
अजून कमीत कमी एक गणपती बघायचा होताच. त्याचं दर्शन अनवाणी पायानेच होणार होतं. बाप्पा सगळीकडे वेगवेगळ्या रूपात असतो. शेवटच्या गणपतीचं दर्शन अनवाणी पायाने चालवून घेणार. कदाचित बाप्पा कालपासूनच सांगत होता की अनवाणी पायानेच दर्शनाला ये. पण मी दुर्लक्ष केला आणि त्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागला.
एकदा मागे वळुन बघितलं आणि तसाच अनवाणी पायाने पुढे चालत गेलो. आता पाय गळयात आलेले आणि साडेपाच वाजून गेलेले. आता जेमतेम समोरचा एक कालाचौकीचा महागणपती बघून काहिकरून निघावं लागणार होतं….
क्रमशः
Leave a comment