
परळचे ते सहा गणपती बघण्यात जवळजवळ एक तास गेला. आता नरेपार्क परळकडून लालबागकडे चालू लागलो. आता जिथे जायचं होतं तिथे चालत जायला पंधरा मिनिटे लागणार होती. मी तसाच चालत निघालो. भूक लागलेली म्हणून रस्त्यात एक वडापाव खाल्ला, तेवढाच पोटाला आधार.
दोन वर्षांनी आज लालबाग आलो होतो आणि ते ही परळवरून. त्यामुळे रस्ता लक्षात येत नव्हता. जर लोअर परेल स्टेशनवर उतरून आलो असतो तर रस्ता पटकन लक्षात आला असता. आता मॅपच्या आधारे त्या ठिकाणी चालत जात होतो. अर्ध्यावर आलो आणि थोडा गोंधळ उडाला. सरळ जायचं की डाव्या हाताला वळून जायचं? मॅप सामान्य दिवशीचा रस्ता दाखवत होता आणि त्याने मला डाव्या बाजूला वळवलं. थोडं पुढे जाऊन पुन्हा उजव्या हाताला वळवलं. त्या मॅप ने बरोबर त्या ठिकाणी पोचवलं पण झालं असं की जिथून त्या मंडपातून बाहेर पडण्याचा मार्ग होता तिथे पोचलो. आणि तिथून काही आत घेणार नव्हते.
आधीच पंधरा मिनिटे चालून आलो होतो. अजून पाच मिनिटे जाणार होती मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी. अक्षरशः वैतागलेलो पण काय करणार, शेवटी हौस महत्वाची. मग पुन्हा मॅप वरून रस्ता शोधत मुख्य द्वाराकडे चालायला लागलो. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित तिथूनच माघार घेतली असती.
आता एकदाचा त्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ आलो. त्या प्रवेशद्वारावर लिहिलं होतं ‘लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली’ म्हणजेच ‘मुंबईचा राजा’.

प्रवेशद्वाराजवळ भक्तांची खूपच गर्दी होती. तिथे थेट किंवा पटकन दर्शन मिळावं त्यासाठी पैसे भरून पास उपलब्ध होते. पण मी बाजूला असलेल्या रांगेतच उभा राहिलो. एकच सरळ मोठी रांग होती. रांग हळूहळू पुढे जात होती. आता रांगेत उभं राहून पंचवीस मिनिटे झाली असतील तेव्हा मध्यावर येऊन पोहोचलो.

मुंबईच्या राजाचं एक वैशिष्ट्य असं आहे की, बाप्पाच्या मंडपासमोर मोकळ्या जागेत वेगवेगळ्या मंदिराची प्रतिकृती साकारली जाते. ह्या वर्षी काशी विश्वेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
रांग अजूनही हळूहळूच पुढे जात होती. समोरच्या मंदिराच्या मागून रांग जात होती. इतरवेळेला दोन मिनिटमध्ये बाप्पाच्या मंडपापर्यंत पोचलो असतो. पण मला इथे येईपर्यंतच जवळजवळ अर्धा तास लागला होता. अजून पुढे किती वेळ लागणार? सकाळी दहा वाजल्या पासून धावपळ आणि आता ही रांग, वैताग आला होता. पुढे अजून गणपती बघायचे होते.
पुढच्या दहा मिनिटांत त्या मंदिराच्या मागे पोचलो. आता समोर गणपतीचा मंडप दिसत होता. तो मंडप सुद्धा मोठ्या इमारतींच्या मधेच होता. हळू हळू रांग पुढे सरकत होती. आता कुठे मंडपात शिरलो. बाप्पाची मूर्ती आता साधारण दिसत होती. बाप्पाच्या पायापाशी खूप गर्दी होती.

हळू हळू बाप्पाच्या पायापाशी पोचलो. बाप्पाचं रूप पाहता तिथून पायच निघत नव्हता. दरवर्षी वेगवेगळ्या रुपात असणाऱ्या बाप्पाचं रूप आजही वेगळ्याच अवतारात होत. आताच अवतार हा विश्वाची निर्मिती करताना होता. मुंबईच्या राजाच आगमन होत नाही कारण त्या बाप्पाची मूर्ती तिथेच घडवली जाते. बाप्पाचं गणेशोत्सवाच्या आधी मुखदर्शन दिलं जातं आणि ते मी ऑनलाईन पाहिलं होत. तेव्हाच हि मूर्ती सुद्धा मनात भरली होती आणि आज प्रत्यक्षात समोर पाहत होतो ..
तिथे एकच गाणं वाजत होतं, ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची.. मुंबईच्या राजाची हो गणेशगल्ली वाल्याची.. आणि बावीस फूट वाले की जय असा जयजयकार करत होते.

बावीस फूट वाले की जय एवढ्यासाठी बोलायचे की मुंबईमधील पहिला बावीस फुटचा गणपती हा लालबाग गणेशगल्ली म्हणजेच ‘मुंबईच्या राजा’ची होती. आणि त्यानंतर आज पर्यंत बावीस फुटाचीच बाप्पाची मूर्ती घडवली जाते.
बाप्पाच्या पायापाशी खूप गर्दी असल्यामुळे तिथले कार्यकर्ते पटापट दर्शन घेऊन पुढे पुढे चालायला सांगायचे. बाप्पा समोर थोडा वेळ हात जोडून उभा राहिलो आणि लगेच बाहेरचा रस्ता धरावा लागला. बाप्पाला बघावं तेवढं कमी वाटत होतं. तरी बाप्पाला शेवटपर्यंत बघत बघत बाहेर पडलो.
आता जिथे सुरवातीला आलो होतो ना तिथेच बाहेर निघालो. जणू मुंबईच्या राजाने त्याच्याभोवती प्रदक्षिणाच घालून घेतली. मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला जवळ जवळ एक तास गेला. तेवढ्याच वेळेत अजून खूप गणपती झाले असते. पण असो.. मनातली इच्छा तर पूर्ण होत होती ना, बस्स..
आता तिथेच बाजू बाजूला खूप महत्त्वाचे गणपती होते. चालून चालून वैताग तर आलेलाच पण तरीही ते गणपती बघायला मार्गस्थ झालो..
क्रमशः
Leave a comment