
एक तास मुंबईच्या राजाच्या दर्शनात गेल्या नंतर आता पुढचा गणपती पाहायला निघालो. गणेशगल्ली सोडली आणि थोडं पुढे चालत गेलो. पाच मिनिटे चाललो असेन आणि संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या बाप्पाचं प्रवेशद्वार आलं. त्या प्रवेशद्वारावर लिहिलं होतं ‘लालबागचा राजा’. कुठल्याही प्रसिद्ध देवस्थानात जेवढी गर्दी असेल, कदाचित त्याच्या दुप्पट गर्दी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत लालबाग राजाच्या दरबारी असते.
मी ह्या आधी फक्त तीन वेळा बाप्पाच्या दरबारी येऊन गेलो होतो. एकदा २०११ ते पण पप्पांसोबत अलिबाग वरून मुंबई. तो अनुभव सुद्धा वेगळाच होता. तो अनुभव आजही आठवतोय. पप्पांना त्यांचा नवस पूर्ण करायचा होता म्हणून धावत पळत घेऊन आले होते. तेव्हा खुप वैतागलेलो. तेव्हा सुद्धा अलिबाग वरून लालबाग येताना अलिबागच्या थोडं पुढे एस.टी. बंद पडलेली. दुसरी एस.टी.मध्ये बसावं लागलेल आणि पप्पांना साधारण पेण पर्यंत उभं राहावं लागलं होतं. त्यानंतर २०१८ला तो मुंबईचा मित्र घेऊन आला होता. नंतर २०१९ला त्या मित्राने माझ्या सोबत येण टाळलं होतं. मग एकटाच बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो. बाप्पा कधी सहजा सहजी दर्शन देत नाही. आणि आजही तेच होत होतं.

लालबागच्या राजाचं सुद्धा आगमन होत नाही कारण बाप्पाची मूर्ती बसल्या ठिकाणीच घडवली जाते. गणेशोत्सवाला सुरवात होण्या आधी बाप्पाचं मुखदर्शन दाखवलं जातं आणि ते ऑनलाईन बघितलं होतं. गेल्या दोन वर्षी कोरोनामुळे बाप्पाचं दर्शन सुद्धा ऑनलाइनच घ्यावं लागलं होतं.
मी आता लालबागच्या प्रवेशद्वारजवळ पोचलो तेव्हा बाप्पाची आरती चालू होती. प्रवेशद्वारासमोर सुद्धा खूप गर्दी होती. बाप्पाची आरती चालू आहे म्हणजे खूप वेळ जाणार. पण बाप्पाचं दर्शन तर काही करून घ्यायचं होतंच. मी बाप्पाच्या मुखदर्शनासाठीची रांग शोधत शोधत पुढे गेलो. तिथे पण पास काढून थेट दर्शन होतं, पण नको. विचार केला एक तास वगैरे लागेल बाप्पाचं दर्शन होईपर्यंत. आता दोन मिनिटे पुढे चाललो असेन. आता साधारण दोन वाजले असतील तेवढ्यात आरती संपली आणि तिथे उभे असलेले पोलीस बापाच्या दर्शनासाठी आत सोडू लागले.
आता सगळेच जण पटापट धावत पुढे पुढे जाऊ लागले. सगळ्या देवळातली रांग परवडली पण लालबागच्या दरबारातली रांग म्हणजे अर्ध्या मुंबईला फेरी मारून परत येऊ एवढी असते. आज दोन वर्षांनी राजाच्या दरबारात आलो. वाटलं होतं पटकन दर्शन होईल.
आधी वाटलं आता अर्ध्यापर्यंत तरी पोचलो असेन. असं बोलता बोलता साडेतीन वाजले. म्हणजे दीड तास झाला तरी अजून रांगेतच होतो. आता एवढा वैताग आलेला की पाय पण थरथरायला लागलेले. आता एवढ्या मध्यभागी आलेलो की तिथून माघारही घेऊ शकत नव्हतो. बाप्पाला साकडं घालत होतो की, बाप्पा पटकन तुझं दर्शन होऊ देत. आधीच काल संध्याकाळ पासून धावपळ, आज सकाळी दहा वाजल्यापासून गणपती बघत निघालेलो. आता दीड तास गेले तरी दर्शन काही होत नव्हतं. आता रांग तर खूपच हळू हळू पुढे जात होती. त्यात बाप्पाच्या दर्शनाला मोठे सेलिब्रिटी आलेले आणि अजून एक भर म्हणजे मुख्यमंत्री साहेब आलेले. आम्ही त्यांना आत स्क्रिनवर पाहत होतो. तेव्हा तर रांग पुढे जाईचना. मनात विचार येत होता की, त्यांना जाऊन सांगावं की एकदा ह्या रांगेत उभं राहून बघा. असो..

आता चार वाजायला आले. रांगेत गोल गोल फिरून पाय गळ्यात आलेले. आता माझ्याकडे काही दुसरा पर्यायही नव्हता. एकटाच असल्यामुळे वेळ घालवण्यासाठी बोलायलाही कोणीच नव्हतं. मोबाईलवर वेळ घालवायचा तर त्याचीही बॅटरी उतरायला आलेली. आता किती वेळ जाईल तो जाईल त्या रांगेत उभं राहणं भागच होतं.
चार वाजून गेले. आता कुठे बाप्पाच्या मंडपा समोरच्या रांगेत पोचलो. तरी अजून बाप्पा काही दिसतच नव्हता. आता जिथे उभे होतो तिथे वरती छप्पर वगैरे काही नव्हतं. चार वाजेपर्यंत वातावरण सामान्य होतं. थोडावेळाने अचानक अंधार दाटून आला. काल पण मुंबईकडे येण्यासाठी निघताना असंच अचानक पाऊस भरून आला होता आणि आताही तेच होतंय की काय? अशी मनांत भीती वाटू लागली.
आता साडेचार वाजले. आता कुठे बाप्पाचं मुख दिसू लागलं. तिथेतर कल्पनेच्या बाहेरची गर्दी. त्यात आता भर म्हणून थेंब थेंब पाऊस पडायची सुरवात झाली. आता दोन पाऊलं चाललो की बापाच्या मंडपात पोचणार होतो. पण आता प्रत्येक पाऊल चालायला पाच मिनिटं जात होती. कस बस आता एकदाचं मंडपात पोचलो. आता कुठे अडीच तासाच्या प्रतीक्षे नंतर बाप्पाच्या दरबारात पोचलो.
मनातल्या मनात बाप्पाचं लालबागच्या राजाचं गाणं गुणगुणत होतो. हा गणपती माझा लालबागचा राजा, नवसाला पावतोss नवसाला पावतो, देव संकटी धावतो…

बाप्पाला समोर बघून अचानक डोळे भरून आले. लोक म्हणतात सगळे बाप्पा एकच आहेत मग कश्याला लालबागच्या राजाच्या रांगेत फुकटचा एवढा वेळ घालवायचा. मी तर म्हणतोय ते पास काढून दर्शन घेणारे आणि सेलिब्रिटी यांनी सुद्धा एकदा ह्या रांगेत उभं राहून बघावं. तुमच्यासुद्धा डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
लालबागचा राजा काय आणि कुठलाच बाप्पा काय, देव एकच असला तरी प्रत्येक ठिकाणची मनातली भावना वेगळी असते, बाप्पाची भव्यता वेगळी असते, बाप्पाचं रूप वेगळं असतं, बाप्पा घडवणारे हात वेगळे असतात आणि मी तेच तर बघण्यासाठी आलोय.
लालबागच्या राजाच्या दरबारात येणारा प्रत्येक जण नवस करण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी येतो. मी रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मनाने राजाच्या दरबारात आलेलो. दोन वर्षाने बाप्पाची भेट झाली. आधीच त्याने खूप काही दिल होतं. बाप्पाने प्रत्येक संकटात हात धरून मार्ग दाखवला होता. आज मला जो काही त्रास होत होता तो त्यालाही झालाच असणार. खरतर दीड तास नाही तर दोन वर्षाने राज्याच्या पायापाशी पोचलो. मन भरू आलं. बाप्पाला बोललो पुढच्या वेळी मी जिथे कुठे असेन तिथुन बिना चपलेचा तुझ्या दरबारी येईन.
आता बाप्पाच्या पायापाशी खूपच गर्दी झालेली. पोलिस, कार्यकर्ते सर्वांना ढकलून तिथून बाहेर काढत होते. मनांत आलं आम्ही एवढे तास रांगेत उभं राहून बापाच्या पायापाशी आलो आणि तुम्ही आम्हाला असे ढकलून बाहेर काढणार. ते सेलेब्रिटी येतात त्यांना पण असच ढकलून बाहेर काढत जा, निदान आम्हाला तरी पटकन दर्शन भेटेल.
आता बाप्पाला मनभरून बघत बघत बाहेर आलो. दीड तासाचा हा बाप्पापर्यंतचा प्रवास कधीही न विसरण्यासारखा होता. आता पाच वाजायला आलेले. बाहेर पडण्याच्या रस्त्याजवळ आलो आणि पावसाने कालसारखा जोर धरला. आधीच पाय गळ्यात आलेले, आता पाऊस पडायला लागला म्हणजे पुन्हा चप्पल पायाला लागणार.
आता पुढे काय? राहिलेल्या बाप्पाचं दर्शन भेटेल का? अजून काही गणपती बघून परतीचा मार्ग धरता येईल का? असे हजारो प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिलेले. तिथूनच लालबागच्या राजाला व्यवस्थित इथपर्यंत पोचवलं म्हणून आभार मानले आणि त्या भर पावसात पुढचे गणपती बघायला निघालो…
क्रमशः
Leave a comment