मी पाहिलेले गणपती आणि अनुभवलेली भव्यता (पंढरीची वारी)

आज गणपती बघण्याची सुरवात ही परळ पासून केली होती. ‘लालबाग परळ म्हणजे गणेश भक्तांची गणेशोत्सवातील पंढरीच‘. आणि आज मी ह्या पंढरीची वारी करत होतो. कारण महाराष्ट्र सोडाच, किमान अर्ध्या देशाची लोकं तरी गणेशोत्सवाच्या ह्या दहा दिवसांत लालबाग परळ मध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले असतात.

आता साडे अकरा वाजले होते.  परळ मधला पहिला गणपती शोधत शोधत एका ठिकाणी पोचलो. आजूबाजूला घरं होती. त्या घरांच्या दारासमोरून वाट शोधत गेलो. घरांच्या आजूबाजूची लोकं तोंडाकडे पाहत होती. तरीही सरळ चालत गेलो आणि समोरच उजव्या हाताला एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिराजवळ पोहोचेपर्यंत रस्ता चुकलो की काय अशी मनांत थोडी भीती होती. त्या मंदिराजवळ जाताच तिथे लिहिलं होतं ‘परळचा लाडका’. ते नाव वाचताच थोडा जीवात जीव आला. आणि त्या छोट्या मंदिरापासून पुढे बाप्पाचा मंडप होता.

परळचा लाडका

एवढ्या आतमध्ये गणपती बोलल्यावर कोणही नवीन व्यक्ती गोंधळणारच. तिथे जास्त कोणीच नव्हतं. एकजण बाप्पाची पूजा करत होता. मी ही बाप्पाच्या समोर गेलो, हात जोडून काही वेळ उभा राहिलो. थोडा वेळ थांबलो आणि तिथून बाहेर पडताच समजलं की मुख्य प्रवेश हा दुसरी कडून आहे. पण तरीही आलो तसाच बाहेर पडलो आणि पुढच्या गणपतीच्या शोधात निघालो.

आता जे ठिकाण ठरवलं होतं तिथे चालत जायला पंधरा मिनिटे तरी लागणार होती. ऊन पण कडक पडलं होतं. पुन्हा मुख्य रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं होतं. आता  ठरवलेलं ठिकाण हे लालबागकडे जाणाऱ्या मार्गातल होतं. परळ करून मग लालबाग जाण्याचा बेत होता.

ठरवलेल्या ठिकाणी जाईपर्यंत उजव्या हाताला, आत एक गणपतीचा मंडप दिसत होता. हा गणपती माझ्या यादीमध्ये नव्हता.  तिथे जाऊ की नको विचार करता करता गणपतीचं नाव वाचलं आणि तो गणपती बघायला गेलो . मंडपाच्या वर लिहिलं होतं ‘परळचा महाराजा’.

परळचा महाराजा

बाप्पाची ही मूर्ती मनांत खूप भरली होती. बाप्पाचं हे रूप बघत पाच-दहा मिनिटं तरी थांबलो असेन. काही केल्या बाप्पावरची नजर काही हटतच नव्हती. अजून पुढचे गणपती बघायचे आहेत, म्हणून तिथून निघालो. मंडपाच्या बाहेर आलो आणि ठरवलेल्या ठिकाणाचा रस्ता धरला. चप्पल अजूनही त्रास देत होतीच. मुख्य रस्त्याला चालता चालता उजव्या हाताला अजून एक मंडप दिसला. हा गणपती सुद्धा माझ्या यादीत नव्हता, तरी माझे पाय त्या मंडपाकडे वळले. ह्या बाप्पाचं नावं होतं ‘परळचा विघ्नहर्ता’.

परळचा विघ्नहर्ता

राम अवतारातला हा बाप्पासुद्धा मन मोहून घेणारा होता. इथे थोडा वेळ बसलो कारण सकाळी दहा वाजता घर सोडलं ते आता पावणे बारा पर्यंत चालतच होतो. थोडा वेळाने बाप्पासमोर हात जोडले आणि तिथून  निघालो. थोडं पुढे जाताच पुन्हा रोडच्या बाजूला एका चाळीच्या मध्ये एक मंडप दिसत होता. मन झालं जावं तिथे म्हणून गेलो. तो बाप्पा ‘श्रीपती ग्रुप’चा होता.

श्रीपती ग्रुप, परळ

बाप्पाची मूर्ती तर आकर्षक होतीच पण तिथली सजावट खूप छान केलेली. थोडावेळ थांबलो आणि लगेच निघालो.

परळचा लाडका बघितल्यानंतर जे ठिकाण ठरवलं होतं त्या ठिकाणी जवळ जवळ अर्ध्या तासाने पोचलो. हा मंडप सुद्धा आतल्या बाजूला होता. बाहेर नावं असल्यामुळे ते ठिकाण लक्षात आलं. इथे सुद्धा आजूबाजूला मोठ्या इमारती होत्या आणि त्यात गणपतीचा मंडप घातलेला होता. हा होता ‘लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर’.

लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर

ह्या बाप्पाचा सुध्दा आगमन सोहळा पाहिला होता. ह्या बाप्पाला बघायची सुद्धा खूप इच्छा होती. वाटलं होतं वेळेअभावी दर्शन घ्यायला नाही भेटणार, पण भेटलं. आता त्याच बाप्पाच्या समोर उभा होतो. ह्या बाप्पासामोर थोडा वेळ उभा राहिलो. मन भरून बाप्पाला बघितलं आणि निघालो.

बाहेर मुख्य रस्त्यावर आलो आणि जवळपासचा गणपतीचा रस्ता शोधू लागलो. आता जो बाप्पा बघायचा होता त्या ठिकाणापर्यंत चालत जायला दहा मिनिटे तरी लागणार होती. गुगल मॅपच्या आधारे त्या बाप्पाचं ठिकाण शोधत गेलो. हे ठिकाणसुद्धा थोडं आतल्या बाजूला होतं. आता चालत चालत परळच्या नरेपार्क मध्ये पोचलो. त्या पार्कमध्ये मोठा मंडप घातलेला. समोर एक छोटीशी रांग होती त्या रांगेत उभा राहिलो. हा बाप्पा परळमधला महत्वाचा बाप्पा आहे. हा होता भव्यदिव्य असा ‘परळचा राजा’.

ह्या बाप्पाचं आगमन बघितलं आणि तेव्हापासूनच भव्यदिव्य परळचा राजा हे नांव तोंडात बसलं. बाप्पाच्या ह्या एक मुख दहा हातांच्या रूपाला बघावं तेवढं कमीच वाटत होतं. मूर्ती खूप उंच होती त्यामुळे मान वर करून बघावं लागत होतं. बाप्पाच्या ह्या मूर्तीला घडवणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. इथे थोडी गर्दी असल्यामुळे जास्त वेळ थांबता आलं नाही. दर्शन घेतलं आणि लगेच निघालो.

आत्तापर्यंत सगळं ठरवल्याप्रमाणे झालं होतं. एकटाच बाप्पाचं दर्शन घेत फिरत होतो. आता परळमधले महत्वाचे गणपती बघून झाले होते. आता लालबागचे गणपती बघायला जायचं होतं. नरेपार्क नंतर आता पहिला कुठला गणपती येईल तो बघायला जायचं ठरवलं.

मला परळ मधले गणपती बघायलाच एक तास गेला होता. आता दुपारचे साडेबारा वाजले होते. ऊन तर डोक्यावर होतच आणि भूकही लागली होती. लिमिटेड पैसे जवळ असल्यामुळे सगळ्याचा विचार करावा लागत होता.

पायाला चप्पल आता थोडी जास्तच त्रास द्यायला लागली, म्हणून तिथल्या एका मेडिकल मधून बँडेज घेतले आणि जखमेवर लावले. आता पुन्हा थोडा आधार भेटला. मॅपवर पुढचं ठिकाण ठरवलं आणि त्या मार्गे चालायला लागलो…

क्रमशः

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment