
रात्री तीन वाजता झोपून सकाळी आठच्या सुमारास जाग आली. खरंतर सकाळी लवकर सात वाजता तरी घरातून निघायचं होतं पण कालच्या धावपळीमुळे उठायची इच्छाच होत नव्हती. अजून तासभर तरी हांतरुणात लोळत राहिलो असेन. शेवटी नऊच्या सुमारास कसाबसा उठलो आणि आवरायला घेतलं. पाणी वगैरे गरम करून अंघोळ करून तय्यार झालो. शेवटचं एकदा खोलीत नजर टाकली आणि दहाच्या सुमारास दरवाजाला कुलूप लावून निघालो. तो मित्र मला सकाळी उठवणार होता आणि सोबतच बाहेर पडणार होतो, पण हाही बेत फिस्कटलेला. असो..
आज पाऊस अजिबात नव्हता. मस्त ऊन पडलेलं. पण आता पायाच्या जखमेवर चप्पल घासत होती त्यामुळे चालताना त्रास होत होता. पाड्याच्या बाहेर पडताच एक मेडिकल आहे तिथून चार बॅंडेज पट्टी घेतल्या आणि दोन्ही पायाच्या जखमेवर लावल्या. आता त्या बॅंडेज पट्टीचा थोडा आधार होता. तसाच चालत स्टेशनकडे गेलो. तिकीट काढलं आणि चर्चगेटकडे जाणारी रेल्वे पकडली.
मला पहिले परळ मधले गणपती बघायचे होते म्हणून पहिले प्रभादेवी स्टेशन उतरणार होतो. नंतर झालं असं की, प्रभादेवी स्टेशन आलं आणि मी थोडासा गोंधळलो. उतरायचं होत प्रभादेवीच पण डोक्यात कुठूनतरी आलं की मला महालक्ष्मी उतरायचं आहे म्हणून. ही गोष्ट जेव्हा लोअर परेल स्टेशन सोडलं तेव्हा लक्षात आली. प्रभादेवी नंतर लोअर परेल सोडलं की महालक्ष्मी स्टेशन. कदाचित प्रभादेवी महालक्ष्मी ह्या दोन्ही देवीच्या नावाच्या स्टेशनमुळे गोंधळ झाला असेल. म काय आता महालक्ष्मी उतरून पुन्हा बोरिवलीकडे जाणारी रेल्वे पकडून प्रभादेवी उतराव लागणार होतं. आधीच धावपळ त्यात अजून ही एक भर.
महालक्ष्मी वरून प्रभादेवी स्टेशन उतरलो. सोबत पाणी घ्यायला विसरलो होतो तर त्या स्टेशनवर पाण्याची बाटली विकत घेतली आणि मॅपवर परळ मधले जवळपासचे गणपती शोधू लागलो. काही वर्षांपूर्वी प्रभादेवी म्हणजेच जुनं एल्फिन्स्टन रोड स्टेशन वरून जवळ जवळ महिनाभर तरी के.ई.एम हॉस्पिटलला जायचो. त्याला आता दहा वर्षे जास्तच झाली होती. त्यामुळे ते ठिकाण माझ्यासाठी एवढंपण अनोळखी नव्हतं .
मी पहिला कुठला गणपती बघायचं हे ठरवलं आणि त्या मार्गाने चालू लागलो. प्रभादेवी स्टेशन सोडून के.ई.एम. हॉस्पिटलकडे रस्त्यावरून सरळ खाली उतरत परळच्या मुख्य रस्त्यावर पोचलो. आता तो मुख्य रस्ता क्रॉस करून डाव्या हाताला दादरकडे वळून परळच्या त्या पहिल्या गणपतीकडे चालू लागलो. मी आता पूर्णपणे माझा वाटाड्या गूगल मॅपवर अवलंबून होतो. तो जसा रस्ता दाखवेल तस जायचं होतं. पण तरीही थोडासा गोंधळलो, कुठे जाऊ काय करू वगैरे. मॅपच्या भरोशे असलो की उत्तर दक्षिण कळेपर्यंत गोंधळ होतोच.
आता प्रभादेवी स्टेशन पासून जवळ जवळ वीस मिनिटे गेली असतील परळ मधला पहिला गणपती शोधेपर्यंत. मी गूगल मॅप प्रमाणे त्या ठिकाणी पोचलो सुद्धा, तिथे गणपतीच्या गाण्यांचा आवाज येत होता. पण तरीही त्या बाप्पाचा मंडप दिसत नव्हता. नंतर तिथे एकाला विचारलं आणि त्याने हातवारे करून सांगितलं इकडे जा म्हणून आणि मी गेलो. तिथे आजूबाजूला चिकटून घरं होती. मी तिथल्या एका घराच्या दारासमोरून गेलो. तिथली माणसं तोंडाकडे बघत होती. तरीपण सरळ चालत गेलो आणि…
कुठे आलो मी? भलत्याच कुठल्यातरी ठिकाणी आलो की काय? चुकलो तर नाही ना…..
क्रमश:
Leave a comment