मी पाहिलेले गणपती आणि अनुभवलेली भव्यता (मालाड)

गोरेगाव स्टेशन गेलं आणि थोडावेळाने मालाड स्टेशन आलं. एक तास रेल्वेचा प्रवास करून मालाडला उतरणार होतो. मुंबई आणि खास करून मालाड (प) माझ्यासाठी काही नवीन ठिकाण नाही. मालाड म्हणजे माझं दुसरं घर. लहानपणापासूनच्या ते आता पर्यंतच्या खूप आठवणी इथे आहेत.

आता मालाड स्टेशनला उतरलो. स्टेशन रोडला जास्त रहदारी नव्हती. पाच मिनिटं चालून एस.व्ही. रोड आणि रस्ता ओलांडून मग आमचा रायपाडा. रायपाडयात जिथून आत शिरतो तिथे थांबलो आणि त्या दुसऱ्या मित्राला फोन केला की मी बाहेर आलोय. तर तो म्हणाला मागच्या रस्त्याला ये. मागचा रस्ता म्हणजे पाड्यात जाण्यासाठीचा दुसरा रस्ता. मी सरळ पाड्यातून न जाता बाहेरून वळसा घालून मागच्या रस्त्याकडे चालत गेलो. माझ्याजागी दुसरं कोणी असतं तर खरच सरळ खोलीत जाऊन झोपला असता. कारण एवढं अलिबाग वरून धावपळ करत गणपती बघत येणं. असो.. मला काही झालं तरी गणपती बघायचे होतेच.

मागच्या रस्त्याला पोचलो. काही वेळ गेला तरी तो मित्र आला नव्हता. तो येईपर्यंत तिथेच बाजूला असणाऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो. त्या मंडळाचं नाव ‘रायपाडा मित्र मंडळ’ आणि गणपती होता ‘रायपाड्याचा महाराजा’.

रायपाडा मित्र मंडळ, मालाड (प)

लहानपणी आमचे आजोबा मालाडमधले गणपती बघायला घेऊन जायचे. आणि तिथल्या गणपतीचं खास आकर्षण म्हणजे तिथे असणारं चलचित्र. आज खूप उशीर झालेला आणि पाऊस होता म्हणून सगळं बंद झालं होतं. गेली दोन वर्षे कोरोनामुळे मी मुंबईमध्ये नसल्यामुळे इकडचे कुठलेच गणपती बघायला भेटले नव्हते ते आज बघत होतो.

रायपाड्याचा महाराजाचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. बाहेर आलो तरी तो मित्र आला नव्हता. त्याला परत फोन केला आणि थोडावेळाने तो आला. मग त्याला सोबत घेऊन आजूबाजूचे गणपती बघायला निघालो.

प्रेरणा मालाड, मालाड (प)

आता पुढे थोडं चालत येऊन पहिलाच प्रेरणा मालाडचा गणपती बघितला. थाटात मोरसिंहासनावर बसलेल्या बाप्पाकडे एक टक बघत राहिलो होतो. थोडावेळ त्याच्यासमोर हात जोडून उभा राहिलो आणि तिथून निघालो.

पुढे गणपती बघायला जाताना मधेच एका गणपती मंडळाचा गणपती होता. तिथे जाऊन त्या बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाचं हे रूप सुध्दा मनांत भरणारं होतं. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथून मंडपाच्या बाहेर आलो. चप्पल पायात घातली आणि आतातर ती जास्तच लागायला लागली होती. खोलीवर काढून आलो असतो तर परवडल असतं पण खोलीवर गेलो असतो तर परत बाहेर यायला कंटाळा आला असता म्हणून. ती चप्पल अर्धवट पायात घालून पुढचा गणपती बघायला निघालो.

श्री बाल मित्र मंडळ, मालाड (प)

आता शिवाजी महाराज चौक मध्ये पोचलो. तिथे ‘श्री बाल मित्र मंडळ’ नावाच्या मंडळाचा बाप्पा असतो. इथे दरवर्षी वेगवेगळ्या रुपातला बाप्पा बघायला भेटतो. ह्यावर्षी बाप्पाच्या रुपातलाच होता पण जास्वंदाच्या फुलावर बसलेला होता. बाप्पाची मूर्ती आकर्षक होतीच पण आश्चर्य पण होतंच की एवढ्या नाजूक फुलावर बाप्पाची मुर्ती कशी काय साकारली असेल. मुर्ती घडवणाऱ्याचे कौतुक करावं तेवढं कमीच. बाप्पाला नमस्कार केला आणि पुढचा गणपती बघायला निघालो. आता तो मित्र माझा वाटाड्या होता. तो घेऊन जाईल तिथले गणपती बघायचे होते.

नटराज मार्केट, मालाड (प)

आता मालाड स्टेशन जवळ असलेल्या नटराज मार्केट मधला गणपती बघायला आलो. बाप्पाचं भव्य रूप मनात भरण्यासारखं होतं. इथे खूप वेळ बाप्पाकडे पहात उभा राहिलो होतो. बाप्पाच्या मागून येणारा मोर सुध्दा मन वेधून घेत होता. जणू तो आता बाप्पाच्या मागून आपल्या समोर येऊन उभा राहील असा भास होत होता.

आता तिथून निघालो. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. आता पुन्हा स्टेशन पासून रायपडा चालायचं होतं. दिवसभराची धावपळ, पाऊस आणि चप्पल यांमुळे पुरता वैतागलेलो. पण काय आता हौस करायची तर पाऊस पडतोच ना. असो..

श्री गणेश मित्र मंडळ, रायपाडा मालाड (प)

आता दहा मिनिटं चालून रायपाड्यात जाण्याचा जो मुख्य रस्ता आहे तिथे येऊन पोचलो. तिथे सुध्दा बाप्पा बसतो. त्या मंडळाचं नावं ‘श्री गणेश मित्र मंडळ, रायपाडा’ म्हणजेच ‘रायपाड्याचा राजा’. आमच्या पाड्याचे एकूण दोन गणपती असतात. हा गणपती दरवर्षी पर्यावरण पूरक असा बनवलेला असतो. ह्या वर्षी सुद्धा कागदापासून बनवलेला होता. कागदापासून बनवलेला असला तरी आकर्षक दिसत होता. तिथल्याच मंडळातल्या मुलांनी तो बनवला होता.

एक खास गोष्ट जी माझ्यासाठी खास आहे ती म्हणजे माझा मामा ह्या दोन्ही मंडळात असायचा. मी ऐकलेलं की एक वर्षी मामाने ह्या मंडळात खूप धम्माल केली होती. एवढ्या वर्षांचा गणेशोत्सव तेव्हा एका दिवसात साजरा केला होता. त्याच्या पुढच्या वर्षी बाप्पा वाजत गाजतच आले पण पुन्हा तशी धम्माल करायला माझा मामा नव्हता. मामा जाऊन आता वीस वर्षे झाली पण दरवर्षी गणपती मंडळात गेलो की मामाची आठवण होतेच.

आता पर्यंत गेटवे चा एक, कुलाब्याचे चार आणि मालाडचे सहा अशे एकूण अकरा गणपती बघून झाले होते. आता अजून वेळ असता आणि पाऊस नसता तर तेवढेच अजून गणपती बघून झाले असते. पण तरीही अकरा गणपती म्हणजे खुपच झाले होते. आता बारा वाजून गेले होते. शेवटचा गणपती बघितला आणि खोलीकडे चालू लागलो. ज्या मित्राने दगा दिला त्याच्या दारात येऊन त्याला फोन केला आणि खोलीवर गेलो. खूप दिवस खोली बंद असल्यामुळॆ कचरा झाला होता. ज्या सोबत मालाडचे गणपती बघायला गेलेलो त्याने पाणी आणलं आणि संपूर्ण खोली साफ करून दिली. आणि ज्याने बेत फिस्कटवला तो जेवण घेऊन आला. दोघांचा खूप मोठा आधार भेटला. अश्या मैत्रीचा असा कुठेतरी उपयोग होत असतोच.

जेवण झालं आणि दीडच्या सुमारास आम्ही तिघेजण बाहेर फिरून आलो. आता तीन वाजायला आलेले. दोघे मित्र त्यांच्या घरी झोपायला गेले आणि मी एकटाच खोलीत झोपलो. उद्या सकाळी उठून निघायचं होतं. राहिलेले गणपती बघून पुन्हा पारतिचा रस्ता धरायचा होता. नंतर झोपताना सहज पायाकडे लक्ष गेलं. दोन्ही पायांवर जणू ब्लेडनेच वार केलेत असं वाटत होतं. एवढी भयानक चप्पल पायाला लागली होती. मग थोडावेळाने तसाच झोपून गेलो …

क्रमश:

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment