मी पाहिलेले गणपती आणि अनुभवलेली भव्यता (इच्छाशक्ती)

कुलाबामधले जे महत्त्वाचे गणपती होते त्यातले चार गणपती बघून झाले होते. आता दुसरे गणपती बघण्याचा विचार करत होतो. मी आता चालत चालत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या समोर बाहेर पडलो. तिथे पहिल्या खूप साऱ्या बस असायच्या पण आता काहीच नव्हतं. थोडा अंधार होता. चर्चगेटकडे जाणाऱ्या बस ची वाट पाहत उभा राहिलो. पण बस येण्याची काहीच चिन्हे नव्हती. कदाचित गेटवे कडे गेलो तर तिथे भेटण्याची शक्यता होती, पण त्यासाठी पुन्हा दहा मिनिटं मागे चालत जावं लागणार होतं.

मी तिथेच पाच मिनिटं उभा राहिलो. जर गेटवे ला जाऊन पण बस नाही भेटली तर पुन्हा एवढं चालत यावं लागलं असतं. त्यात चपलेचा त्रास होताच. तशी गेटवे वरून टॅक्सी सहज भेटली असती पण त्या साठी वीस-तीस रुपये जास्तीचे घालवावे लागले असते. कारण बसच तिकीट चर्चगेट पर्यंत फक्त सहा रुपये इतकेच आहे. मला पैशाचा विचार करावा लागत होता कारण जेमतेय अलिबाग ते मुंबई आणि मुंबई ते अलिबाग जाण्या-येण्या इतकेच पैसे जवळ होते. शेवटी थोडा विचार केला आणि चर्चगेटकडे चालतच निघालो. रस्त्यावर जास्त रहदारीही नव्हती. कदाचित दहा वाजले असतील म्हणून आणि पाऊस असल्यामुळे.

खरतर पंधरा मिनिटे पण चपलेच्या त्रासामुळे मला आता वीस मिनिटं चर्चगेट पर्यंत चालायचं होतं. ऑपरेशन करताना जसं तेवढा भाग सुन्न करतात तसं चप्पल लागत असलेला भाग मनातून सुन्न करून चालावं लागणार होतं. हुतात्मा मैदान, मुंबई हाय कोर्ट पार करत आता लांबून चर्चगेट दिसू लागलं. पहिल्यांदाच एवढ्या त्रासात आणि काळोखात एकटाच चर्चगेट चालत जात होतो. आयुष्यात एकटं राहण्याचा, फिरण्याचा तसंच मनावर आणि शरीरावर जखमा होत असूनही एवढ्या त्रासात पुढे चालत राहण्याचा आता फायदा होत होता. माणसाला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमधून एक अनुभव मिळत असतो आणि मला आज तर खूप सारे अनुभव भेटत होते.

शेवटी आता कसाबसा चर्चगेटला पोचलो. आता थोडासा जीवात जीव आला. काही क्षण विचार करत घालवला की आता पुढे काय करायचं? आता सव्वादहा वाजले होते. साडेआठ वाजता गेटवे वरून सुरवात केली होती ती आता सव्वादहाला संपली. म्हणजे जवळजवळ दोन तास चार गणपती बघण्यात गेले होते. आता अजून गणपती बघण्याची इच्छा होतीच पण पुरता कंटाळलेलो. तरीसुद्धा त्या मुंबईच्या मित्राला फोन केला, ”मी मालाडला येतोय आपण तिथले गणपती बघुयात म्हणून.” आणि तो बोललेला सुद्धा की मालाडला ये आपण तिथले गणपती बघू म्हणून.

पण त्याने परत मुडऑफ केला. म्हणाला, ”पाऊस पडतोय तर वैताग येतोय पावसात बाहेर पडायला.” तेव्हा त्याचा राग आलेला पण तो राग काढणार तरी कोणावर. तो मुंबईमध्ये राहून सुध्दा त्याला पावसात बाहेर पडायचा कंटाळा आला होता आणि मी एवढ्या लांबून अलिबाग वरून मुंबई आलो ते पण एवढ्या त्रासातून त्याचं काहीच नाही का? मी सगळ्यांच्या सोयीनुसार जुळवून घ्यायचं आणि माझ्यासाठी कोणाची जुळवून घेण्यासाठी तय्यार नाही. खूप वाईट वाटलं होतं तेव्हा, पण बाप्पासाठी आपण एवढी धावपळ करत आलोय म्हणून शांत झालो. लगेच तिथल्याच दुसऱ्या मित्राला फोन केला आणि तो लगेच तय्यार झाला. मला आता मालाडला पोचायला एक तास तरी लागणार होता.

रेल्वे स्टेशनच्या जवळपासचे गणपती बघण्याचा बेत सुद्धा फिस्कटला होता. वेळेअभावी मालाडचे गणपती बघायला भेटतील असं वाटतं नव्हतं, पण आता वेळ आलेली ते बघण्याची. पाऊस कमी झाला होता. जवळजवळ दोन तासांनी आता बसायला भेटलं होतं. आणि एक तासासाठी चपलेच्या त्रासापासून मुक्तता मिळणार होती.

मी मालाडकडे जाणारी रेल्वे पकडली, थोडावेळातच रेल्वे चालू झाली आणि डोळे बंद करून तसाच शांत बसलो. मनात विचार येत होते कि, ”माझ्याजागी दुसरं कोणी असत तर त्याने एवढ्या त्रासात एव्हडा प्रवास आणि धावपळ केली असती का? समोरच्याचा जर आपल्यामुळे बेत फिस्कटला तर तो आपल्यावर राग काढतो मग आपण कोणावर काढायचा?” आधीच सकाळपासून त्रास सहन करत आलेलो आणि त्यात अजून सहन करतोय.

बाप्पाला भेटण्याच्या इच्छाशक्ती मुळेच कदाचित एवढं सहन करू शकलोय…

क्रमशः

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment