मी पाहिलेले गणपती आणि अनुभवलेले भव्यता (कुलाबा)

कुलाब्याचा युवराजाचं मानाझरखं दर्शन झालं आणि त्याच्या जवळ असणाऱ्या गणपती बापाच्या दर्शनाला निघालो. मॅपवर तर त्या बाप्पाचं अंतर जवळ दाखवत होतं, पण ते ठिकाण माझ्यासाठी अनोळखी असल्यामुळे जवळ असूनही खूप लांब वाटत होतं. दुसऱ्या ठिकाणी जाताना सुद्धा वाटत होतं की रस्ता चुकलो तर नाही ना. मॅप बरोबर ठिकाण दाखवत पण आपण चुकतो. तिथे खूप रस्ते होते त्यामुळे चुकलो की काय असं वाटू लागलं होतं. पण नाही, पुढे पुढे चालत राहिलो आणि समोर मंडप दिसू लागला. पण हा मंडप तर बऱ्यापैकी मोठा होता. म्हणजे एखादं शुभ कार्य असल्यावर जसा मंडप घालतो अगदी तसाच.

कुलाब्याचा राजा

त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून आत गेलो. समोर बाप्पाची बसलेली भव्य अशी मूर्ती दिसत होती. ती गणेश मूर्ती ‘कुलाब्याचा राजा’ची होती. ह्या बाप्पाचे सुद्धा आगमनाचे फोटो पाहिले होते. तो बाप्पासाठी घातलेला मंडप, मंडप नसून एखाद मंदिरच भासत होत. तिथल्या मंडळाच्या पुढारींनी उत्तम सजावट आणि नीटनेटकेपणा ठेवला होता. आणि एवढं सगळं करणारच ना! कारण शेवटी कुलाब्याचा राजा तो.

इथे सुद्धा 5-10 मिनिटे थांबलो असेन. बाप्पाला मनभरून बघितलं आणि तिथून निघालो. मंडपाच्या बाहेर आलो आणि पुन्हा पावसाने जोर धरला. मोबाईलवर हात धरून मॅपवर अजून कुठला जवळ गणपती आहे तो बघू लागलो. तिथून 5-10 मिनिटांवर एक ठिकाण दिसत होतं. पण थोडासा गोंधळलो. मॅप दाखवत असलेला रस्ता आणि प्रत्यक्षात समोर दिसणारा रस्ता मेळ खात नव्हता. आणि त्यात वळण असेल तर आजूबाजूला छोट्या मोठ्या गल्ल्या आहेतच. मॅप बघितलेला रस्ता डोक्यात पक्का केला. मोबाईल आत ठेवला कारण पाऊस पडत होता आणि मॅप ने दाखवलेल्या मार्गावर पुढे पुढे चालू लागलो.

आता समोर मुख्य रस्ता दिसत होता. त्या रस्त्यावरून बाहेर पडताच डाव्या हाताला सरळ चालत जायचं होतं. सरळ सरळ चालत गेलो आणि थोडं पुढे जाताच गोंधळलो. कारण आता जो गणपती बघणार होतो त्याचा मंडप कंपाऊंडच्या आतल्या बाजूला होता. असं वाटत होतं की एखाद्या विशिष्ट बिल्डिंगसाठी वगैरे असावा. मॅपमध्ये तर हेच ठिकाण दाखवत होतं. मी आत शिरलो. आत मधून आरतीचा आवाज येत होता. नशिबाने त्या दिवशीची बाप्पाची आरती भेटली.

कुलाब्याचा लाडका

त्या मंडपाच्या आत शिरलो. समोर लिहिलं होतं ‘कुलाब्याचा लाडका’. ह्या बाप्पाचं रूपही आकर्षक होतं. विशेष म्हणजे फुलपाखरावर बसलेला अवतार होता. ह्या बाप्पाचे सुद्धा आगमनाचे फोटो पाहिले होते पण याही बाप्पाचं नाव विसरलो होतो. हा बाप्पा सुद्धा बघायची ओढ होतीच.

काही वेळ थांबलो तिथे कारण आरती चालू होती. त्या बाप्पाच्या समोर एक कृत्रिम तलाव बनवलेलं. मंडप तसा खूप मोठा होता. तिथेही एवढी काही गर्दी नव्हती. बाप्पासमोर पुन्हा एकदा हात जोडले आणि बाहेर पडलो. बाहेर येऊन अजून जवळ कुठला गणपती आहे का ते मॅपमध्ये शोधत राहिलो. पुढे सरळ चालत गेलो असतो तर अजून 2 गणपती होते. पण अजून 20 मिनिटे चालावं लागणार होतं. पुढे जाण्याच्या दुप्पट पुन्हा मागे यावं लागलं असतं म्हणून तिथूनच मागे फिरलो. तिथून मागे आता 5-10 मिनिटांवर एक गणपती होता. कुलाबाचा राजा त्याच्या समोरचं ठिकाण दाखवत होतं. आणि त्याच रस्त्याने बाहेर पडायचं होतं.

मॅपच्या भरोशे होतो म्हणून त्या बाप्पाचं ठिकाण शोधताना गडबड झाली. गणपती पुढच्या गल्लीत होता आणि मी आधीच्या गल्लीत ते ठिकाण शोधत राहिलो. शेवटी तिथे एकाला विचारलं आणि त्याने सांगितलं पुढे आहे म्हणून. आणि त्या रस्त्याला लागलो.

माझी चप्पल अजूनही त्रास देत होतीच आणि आतातर जास्तच. 3 गणपती बघेपर्यंत जवळ जवळ आता 1 तास तरी झाला असेल आणि आता बघेन तो चौथा. पायाला लागणारी चप्पल कशीबशी सहन करत करत त्या चौथ्या गणपतीच्या मंडपात गेलो. पावसाचे खेळ तर चालूच होते. मी त्या मंडपात गेलो. आतमध्ये खूप मस्त वातावरण होतं. बाप्पाची मूर्ती पण मनात भरणारी होती.

कुलाब्याचा सम्राट

त्या बाप्पाचं नाव होतं ‘कुलाब्याचा सम्राट’. राज दरबारात आल्या सारखं वाटत होतं. थोड़ा वेळ तिथे थांबलो आणि तिथून निघालो.

मंडपाच्या बाहेर आलो आणि बाहेर काढलेल्या त्या चपलेकडे पहायची पण इच्छा होत नव्हती, पण काय करणार टाकुही शकत नव्हतो. कशाबशा घातल्या आणि बाहेरचा रस्ता शोधत निघालो. आता कुलाबामधले पाहिजे ते गणपती बघून झाले होते. आता पुन्हा गेट वेकडे बाहेर पडायचं होतं आणि शक्य झालं तर तिथून पुढचे गणपती.

मॅपवर बाहेर पडण्याचा रस्ता शोधला आणि चालू लागलो. बाहेर घेऊन जाणार रस्ता छत्रपती शिवाजी महाराज संग्रलयाच्या समोर निघणार होता. मी तो रस्ता धरला आणि चालायला लागलो…

क्रमशः

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment