
त्या काळ्यारंगाच्या मंडपात आत जाताच समोर एक भव्य अशी गणपतीची मूर्ती दिसली. ते बाप्पाचं रूप पाहून मनांत एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. दुःख, त्रास सगळं काही विसरून गेलो. जे समोर पाहत होतो ते बाप्पाचं रूप हे मल्हार मार्तंड म्हणजेच जेजुरीच्या खंडोबाच्या रूपातलं होतं.
खंडोबा म्हणजे आमचं कुलदैवत आणि नकळत त्याच्या रूपाच पहिले दर्शन झालं. त्यामुळे मनांत उत्साह निर्माण झाला होता. आणि दुसरं कारण हे की मी बोलत होतो की कुलाब्याचे गणपती बघायला भेटले नाही भेटले तरी चालेल पण एक मनांत असेलेल्या बाप्पाचं दर्शन झालं पाहिजे. आणि योगा योगाने त्याच बाप्पाचं पहिले दर्शन झालं.
त्या बाप्पाचं (मंडळाचं) नावं होतं ‘कुलाब्याचा युवराज’. ह्या बाप्पाचा आगमन सोहळा सोशल मीडियावर बघितला होता. तेव्हा मल्हार मार्तंडच्या रुपातला हा बाप्पा मनांत खूप भरलेला. तेव्हापासूनच कुलाब्याचा युवराजची ओढ लागलेली. मी खूप वेळ जवळ जवळ 10-15 मिनिटे तरी बाप्पाला पाहत उभा राहिलो असेन.

मुंबईच्या काही सार्वजनिक ठिकाणी जिथे बाप्पाच्या अश्या मोठ्या मोठ्या मूर्ती असतात तिथे खूप गर्दी असते आणि 1 मिनिट सुद्धा त्यासमोर हात जोडून उभं राहता येतं नाही. पण इथे असं काहीच नव्हतं. कदाचित पाऊस असेल म्हणून गर्दी नसावी, पण तरीही काहीच गर्दी नव्हती. कोण येईल तो मनांत येईल तेवढं बाप्पाच्या समोर हात जोडून उभं राहायचा. बाप्पाचे आणि बाप्पासोबत स्वतःचे फोटो काढून जायचा. मी फक्त बाप्पाचे फोटो काढले कारण माझे बाप्पासोबत फोटो काढायला कोणी नव्हतं ना. आणि सेल्फी मध्ये मज्जा नसती. असो, बाप्पाचे काढले तेच खूप झाले.
ठरवलेल्यापैकी पहिल्या बाप्पाचं दर्शन झालं, तेही मनापासून ज्या बाप्पाला बघायची इच्छा होती त्याचं. हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. अजून पण पुढे खूप अनुभव येणार होते. ही तर फक्त एक सुरवात होती.
मल्हारी रुपातल्या बाप्पाला पुन्हा एकदा मनापासून पाहिलं, हात जोडून नमस्कार केला आणि तसाच उलट्या पावली मागे चालत गेलो. बाहेर पडता पडता बाप्पाला एवढचं बोललो की पुढच्यावेळी मी तुझ्या दर्शनाला येईन तेव्हा एवढा त्रास नको देउस, बस्स.
आता मंडपाच्या बाहेर आलो. चपलेकडे बघितलं आणि बोललो परत आता हिला पुन्हा झेलायचं आहे. पण काय करणार घालाव्या तर लागतीलच. चपला पायात घातल्या आणि मंडपाच्या समोरच्या टपरीच्या आडोश्याला उभा राहिलो. मोबाईल काढला आणि दुसरा जवळ पास कुठला बाप्पा आहे ते बघू लागलो.
तिथे आजूबाजूला खुप घरं होती, खूप छोट्या गल्ल्या होत्या. त्यामुळे मॅप मधला रस्ता नक्की कुठला, हे शोधत जवळपास असणाऱ्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी निघालो…
क्रमश:
Leave a comment