
आता समोर एकदाचं गेट वे दिसूं लागलं होतं. जीवात जीव आला एकदाचं पोचलो मुंबई. बाप्पाने आपला हा प्रवास सुखरूप पार पाडला. पाऊस अजूनही पडतच होता. त्या हलणाऱ्या बोटीतून एकदाचा उतरलो. सर्वात मोठी भीती पार केली होती. 8.30 वगैरे वाजले असतील. लगेच गेट वेच्या बाहेर रस्त्यावर आलो. थोडी भूक लागली होती. गेट वेच्या बाहेर बाप्पा विराजमान झालेले होते. तिथे प्रसाद म्हणून शिरा भेटला. तेवढाच पोटाला आधार दिला बाप्पाने.
आता पुढे काय? ज्याच्या भरोशे होतो त्यानीच फिस्कटवलं सगळं. तशी मुंबई माझ्यासाठी नवीन नाही. माझा जन्मच इथे झालाय तर माझी आईच आहे ती. लहानपणापासून मुंबई येतोय, आणि गेली 6 वर्षे तर संपुर्ण मुंबई पायाखाली घातलेली होती. पण तरीही आता मुंबईमधल्या कोणाचीतरी सोबत पाहिजे होती, कारण त्याला जास्त अंदाज असू शकतो की कुठे किती वेळात पोहचू वगैरे.. पण असो, आता एकट्यालाच काय तो निर्णय घ्यायचा होता. भरपावसात एकट्यानेच गणपती बघायचे की आपल्या खोलीवर जाऊन उद्या सकाळीच काय ते ठरवायचं.
थोडा वेळ असाच विचारात गेला. पाऊस तर पडतच होता. आता गणपती बघायला गेलो तर आपला वाटाड्या कोण? नंतर एका आडोश्याला उभा राहिलो आणि मोबाईल बाहेर काढला. गूगल मॅप उघडला. त्यात मी मुंबईचे जवळ जवळ 50 पेक्षा जास्तच गणपतीची ठिकाणं सुरक्षित करून ठेवली होती. त्यात जवळपासचे गणपती बघितले तर कुलाब्याचे गणपती दिसले.
खरंतर आमचा बेत असा ठरला होता की कुलाब्याचे जवळचे गणपती बघत पश्चिम रेल्वे लाईनच्या जवळ असतील ते गणपती बघून मग मालाडचे गणपती बघायचे. तरी ह्या आधी मी वेळेअभावी 3-4 वेळा बेत बदललेला. त्या मित्राने जर आधीच सांगितलं असतं नाही जमणार तर आधीचे 2 दिवस सुट्टी काढून आलो असतो आणि सगळे गणपती बघून गेलो असतो. पण आता जेमतेम आताची रात्र आणि उद्याचा फक्त दिवस. आता बघून बघून किती बघणार? विचार केला आता आलोच आहे तर बघूनच जाऊयात. पावसाला आता किती पडायचं आहे ते पडुदे. गूगल मॅपला आपला वाटाड्या केलं आणि कुलाब्याचे गणपती बघायला निघालो.
कुलाबा ठिकाण बाहेरून खूप वेळा बघितलं होतं पण आतमध्ये कधीच गेलो नव्हतो. पहिला कुठला गणपती बघायचा ते ठिकाण ठरवलं आणि लागलो त्या मार्गाला. ताज हॉटेलच्या मागच्या बाजूने निघालो. पाऊस पडत होता म्हणून मोबाईल हातात ठेवता येत नव्हता. मॅप मधला रस्ता आठवून जावं लागत होतं. आणि शहर ठिकाणी एकाला एक जोडून खूप रस्ते असतात. त्यात हे अनोळखी ठिकाण. मॅप भरोशे रस्ता शोधायचा होता.
तरी 10 मिनिटं चाललो असेन. काहीच समजत नव्हतं नक्की कुठे चाललोय. मधेच एखाद्या आडोश्याला उभं राहून मोबाईल बाहेर काढून मॅप बघत होतो. थोडा अजून पुढे चालत गेलो आणि आधीच एवढा त्रास झाला होता त्यात अजून एक त्रास. असं वाटत होतं की जणू बाप्पा मुद्दामून परीक्षा घेतोय की काय? आणि आताच त्रास तर थोडा जास्तच त्रासदायक होता. पावसामुळे पायाची त्वचा नरम पडली आणि पायात घातलेल्या चपलेच्या कडा सुरीच्या धारेसारख्या धारदार झाल्या होत्या.
अजून ठरवल्या पैकी एकही गणपती बघितला नव्हता, अजून कितीतरी गणपती बघायचे होते आणि त्यात आता चप्पल रडवू लागली होती. आता तर दोन्ही पायांना चप्पल लागू लागली. तरीपण माघार न घेता पूढे चालतच राहिलो. आता काय व्हायचं ते होईल. बाप्पाला परीक्षा घ्यायची असेल तर घेऊदेत, मी पण कमी हट्टी नाही. पुढे चालतच राहिलो.
मनांत आता शंका येऊ लागल्या की ठरवलेल्या गणपतीपैकी एकतरी गणपती बघता येईल की नाही? कारण रात्रीची वेळ, अनोळखी ठिकाण, जोरदार पाऊस आणि त्यात ही चप्पल….
क्रमश:
Leave a comment