मी पाहिलेले गणपती आणि अनुभवलेली भव्यता (प्रवास)

जाऊ की नको जाऊ करता करता शेवटी निघालोच. मांडवा जेट्टीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलो. बाहेर पाऊस पडतच होता आणि विजाही चमकत होत्या. पण तरीही स्वतःला धीर देत होतो. ”बाप्पा आहे सोबत, तो सुखरूप पोहोचवले.”

थोड्यावेळाने बस चालू झाली. तिने आता मांडवा जेट्टीचा रस्ता पकडला. खिडकीतून बाहेर बघितलं तर पावसाने केलेल्या काळोखामुळे रात्रीचे 9 किंवा 10 वाजलेत असं वाटत होतं. मी डोळे बंद करून बसच्या मागच्या सीटवर शांत बसून राहिलो . जवळ जवळ 1 तासाचा बसचा प्रवास करून आता मांडवा जेट्टी दिसू लागली. बस मधून उतरलो आणि समोर फक्त समुद्राचा आवाज येत होता, काळोखामुळे समुद्र तर दिसतंच नव्हता. मधेच विजाही चमकत होत्या.

बस मधून उतरताच जेट्टीकडे धाव घेतली. माझ्यासोबत आणखी लोक सुद्धा होतेच. जेट्टीकडे जाताना बाप्पाचं एक छोटं मंदिर आहे. बाप्पाला चालता चालताच नमस्कार केला आणि पुढे निघालो. आता समोर रांग दिसत होती त्या रांगेत उभा राहिलो. मधेच पाऊसही जोर धरत होता. अजूनही बोट जेट्टीला लागली नव्हती. 5 ते 10 मिनिटं रांगेत गेली असतील आणि थोड्यावेळाने 7 वाजताच्या दरम्यान एक बोट मुंबई जेट्टीकडून प्रवाश्यांनी भरून येताना दिसली. त्याच बोटमध्ये मुबंई जायचं होतं.

एवढ्या पावसात, उसळणाऱ्या समुद्रात बोट जेट्टीला लागेपर्यंत वेळ गेला. बोट जेट्टीला लागताच त्यातले प्रवासी उतरू लागले. भर पावसात ”एवढे लोक येऊ शकतात म्हणजे आपण सुद्धा नक्कीच सुखरूप पोहचू”, स्वतःलाच धीर देत होतो. सगळे प्रवासी बोटीमधून उतरताच रांगेत उभे असलेले प्रवासी एक एक करून बोटीत चढू लागले. बोट पाण्यावर जास्तच हालत होती. बोट तशी मोठी आणि मजबूत होती. बोटमध्ये चढताना एखाद्याच्या हाताचा आधार घेऊन चढावं लागत होतं.

अजूनही मी तिथून माघार घेऊ शकत होतो. कारण अजूनही मनात भीती ही होतीच. पण नाही, आता निघालो आहेच तर जाऊयात. बाप्पावर विश्वास होता की, तो सुखरूप पोचवेल म्हणून.

बोटीमध्ये बसलो. बोटीच्या बाहेर सगळीकडे अंधार, वीजही चमकत होती. थोड्या वेळाने बोट चालू झाली, मनांत बाप्पाचं स्मरण केलं आणि शांत बसून राहिलो. थोड्यावेळाने मनातली भीतीही कमी होत गेली. पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता. मनांत फक्त हाच विचार चालू होता की एकदाच गेट वे ला पोहचूदेत बस्स.

बोटीने अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केलं होतं आणि ज्या मुंबईच्या मित्राच्या सोयीनुसार बेत आखला होता तो पुन्हा एकदा त्याने फिस्कटवाला. म्हणाला की उद्या ऑफिस आहे तर तुझ्यासोबत गणपती बघायला जमणार नाही. तू एकटाच बघ म्हणून. तरी स्वतःला धीर देत बोललो ठीक आहे चल.

तरीही तो त्या संध्याकाळी कामावरून सुटून कुलाबा भेटणार होता. तिथून थोडे गणपती बघत मग थेट मालाडचे गणपती. राहिलेले दुसऱ्यादिवशी सकाळी बघणार होतो. आता थोड्यावेळातच गेट वे पोहोचणार म्हणून थोडा उत्साहात होतो. आणि थोड्यावेळात पुन्हा त्या मित्राचा मेसेज आला की मला आताही नाही जमणार बाहेर जायचं आहे म्हणून. मालाड ला ये तिकडचे बघू.

तेव्हा तर माझी मनस्थिती खूप वाईट झाली होती. जेव्हा आपण एखादा बेत बनवतो आणि शेवटच्या क्षणाला कोण फिस्कटवतो ना खूप मनाला लागतं. कारण आपण आधीच त्यांच्या सोईनुसार बेत बनवलेला असतो आणि त्यातही ते असे वागतात.

आता तर गेट वे पोहोचलो. पण पुढे काय? पुढचा बेत काय? बाहेर पाऊस पण पडतोय, एकटा कुठे फिरणार? कुठले गणपती बघणार? काही वेळ असाच पावसात उभं राहून घालवला आणि मग पुढे ….

क्रमश:

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment