
मुंबईचे गणपती बघण्याचा बेत जवळ जवळ गणपती बसण्याच्या महिनाभर आधीच झाला होता. खूप ओढ लागली होती बाप्पाचं दर्शन घेण्याची. जरी सगळीकडे बाप्पा एकच असला तरी त्याची वेगवेगळी रूपं पाहण्याची मज्जा काही वेगळीच असते.
अखेर गणपती बघायला जायची तारीख मुंबईच्या एका मित्राच्या सोयीनुसार ठरवली. अनंत चतुर्दशीच्या आधी म्हणजे 7 तारखेला संध्याकाळी. 8 तारखेला दिवसभर गणपती पहायचे आणि संध्याकाळी निघायचं. कारण दुसऱ्या दिवशी 9 तारखेला आमचा घरच्या गणपतीचं विसर्जन होतं म्हणून.
खरं म्हणायचं तर त्यादिवशी मुंबईला जाण्याचा बेत केलेला खरा, पण त्यावेळी जाण्यासाठी खिशात पैसे सुद्धा नव्हते. ज्या मित्राच्या भरोशे होतो त्यानेच आयत्या वेळी नाही आहेत म्हणून सांगितलं. पहिला मूड ऑफ तर इथेच झाला होता. पण बाप्पाला मला भेटायची ओढ होती का काय माहिती, त्यानेच पैशाची सोय करून दिली. आणि पुन्हा डोक्यात बेत रंगवू लागलो.
7 तारखेला दुपारपर्यंत मस्त ऊन पडलेलं. मी घरातून तय्यारीतच ऑफिसला गेलेलो आणि मग तिथूनच थेट मुंबई जाण्याचा बेत आखला होता. सगळं काही सेट झालं होतं आणि पुन्हा दुसऱ्यांदा माझ्या योजनेला ग्रहण लागायची वेळ आली होती, म्हणजे अचानक खूप पाऊस भरून आला होता. सगळीकडे काळोख पसरलेला आणि जोरात पाऊस पडू लागला होता. त्यात विजाही भयानक चमकत होत्या.
ऑफिस मधून खरंतर लवकर निघणार होतो पण अचानक पावसाने माझ्या योजनेवरच धाड टाकली. संध्याकाळचे 5 वाजून गेले. बाहेर काळोख, पाऊस आणि त्यात विजाही चमकत होत्या. जाऊ की नको आणि गेलोच तर सुखरूप पोहोचेन की नाही अशा मनांत शंका कुशंका येत होत्या. एवढ्या पावसात अलिबाग ते मुंबई बस ने जायला सुद्धा भीती वाटत होती. तेव्हा बोटी सुद्धा चालू झाल्या होत्या. तसा बोटीने संध्याकाळचा प्रवास खूपवेळा केला होता पण भर पावसात बोटीने जाणं म्हणजे बस ने जाण्यापेक्षा भीतीदायक वाटत होतं.
संध्याकाळचे 5.30 वाजायला आले होते. पाऊस थोडासा कमी झाला होता. मी लगेच बोटीच्या ऑफिसमध्ये फोन केला. ते म्हणाले बोट चालू आहे. मनाला थोडा धीर दिला आणि लगेच निघालो. अलिबाग वरून मांडवा जेट्टीकडे जाणारी 6 वाजताची बस सुटणार होती. मी माझी गाडी अलिबाग मध्येच एका मित्राकडे पार्क केली आणि लगेच त्या बोटीच्या ऑफिस जवळ गेलो. बस लागलेलीच होती. तिकीट काढलं आणि बसमध्ये जाऊन बसलो. पाऊस रिमझिम पडतच होता. मनांत तरीही भीती होतीच की सुखरूप पोहोचेन की नाही वगैरे.
शेवटी एकदाची ती बस चालू झाली आणि तिने मांडवा जेट्टीचा रस्ता धरला आणि पुढे ….
क्रमशः
Leave a comment