
गणेशोत्सव म्हणजे भारतातील खास करून महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. गणेशोत्सवाच्या ह्या 10 दिवसांत बाप्पाची वर्षभर वाट पाहणाऱ्या भक्तांचा आनंद गगनाला भिडलेला असतो.
लोकमान्य टिळकांनी चालू केलेला हा सार्वजनिक उत्सव आजही तेवढाच महत्वाचा ठरतो. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात ही पुण्यातून केली होती. त्यानंतर मुंबई. आज जर टिळक असते तर त्यांना सुद्धा ही गर्दी, जल्लोष, उत्साह, एकात्मता पाहून खूप आनंद झाला असता. खरंतर आज टिळक नाहीत पण त्यांच्या सारख्या थोर पुरुषाची गरज भासत आहे. त्या काळी इंग्रजांना मात देण्यासाठी सार्वजनिक उत्सव चालू केले होते, आणि आज आपल्याच लोकांना घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी टिळकांसारख्या थोर महापुरुषाची गरज आहे. असो..
मी सुद्धा गणेश भक्त आहे. मलाही ह्या गणेशोत्सवातील 10 दिवसांची ओढ लागलेली असते. आमच्याकडे सुद्धा सर्वांचा मिळून एक गणपती बाप्पा असतो. त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र असतो. त्या साठी सुद्धा टिळकांचे आभारच म्हणावे.
खास करून मला सुद्धा मुंबईच्या गणपतींची खूप ओढ लागलेली असते. वर्षभर वाट पाहत असतो आणि कधी 10 दिवस संपून जातात समजतही नाही. गेली 2 वर्षे कोरोनामुळे मुंबईचे गणेशोत्सव नसल्यातच जमा होते. पण ह्या वर्षी मात्र जल्लोषातच आगमन झाले.
मला तर बाप्पाची ओढ त्यांच्या आगमनापासूनच लागलेली असते. तेव्हा मुंबईला जाणं शक्य नाही होत पण आज इंटरनेटच्या माध्यमातून आगमन सोहळासुद्धा घरबसल्या अनुभवता येतो. तरीसुद्धा बाप्पाच्या भव्य दिव्य अश्या रूपाचे जवळून दर्शन घ्यायची ओढ लागलीच असते. मी आधीच ठरवलं होतं, काही झालं तरी मुंबईला जाऊन बाप्पाचं दर्शन घ्यायचंच म्हणून.
मुंबईला जाण्यापासून ते परत घरी येण्यापर्यंतचा प्रवास हा खरच बिकट, थोडा त्रासदायक, भीतीने भरलेला असा होता. पण बाप्पाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झालं आणि जेवढं जमलं तेवढया बाप्पाचं दर्शन घेता आलं.
हे सगळं काही क्रमशः उलगडून सांगणार आहे. खरंच, बाप्पाचा एखादा वेडा भक्तच असं काही करू शकतो..
क्रमशः
Leave a comment